इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमध्ये गुंडाराज आहे असे नेहमीच म्हटले जाते. त्याचा अनेक वेळा प्रत्यय येतो. सध्या अशीच एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. २७ वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी खासदाराची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात गुंडाराज असल्याची सर्वसामान्य नागरिकांची भावना झाली आहे.
बिहारचा माजी खासदार आनंद मोहन सिंहची गुरुवार, दि. २७ एप्रिल रोजी पहाटे तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगाचे नियम बदलून गुंड प्रवृत्तीतून राजकारणी झालेल्या आनंद मोहन सिंहच्या सुटकेचा मार्ग मोकळा केल्याबद्दल आता बिहार सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. आनंद मोहन सिंह हा त्याचा मुलगा, आमदार चेतन आनंद याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो २६ एप्रिलला कारागृहात परतला होता आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ एप्रिलला त्याची सुटका झाली.
आनंद मोहन सिंह हा संसद सदस्य एक आयएएस अधिकारी व तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी जी. कृष्णैय्या यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आनंद मोहन सिंहने चिथावणी दिलेल्या जमावाने १९९४ मध्ये आयएएस जी. कृष्णैय्या यांची हत्या केली होती. त्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आयएएस अधिकारी जी. कृष्णैय्या हे तेलंगणातील महबूबनगरचे रहिवासी होते. वास्तविक या प्रकरणात आनंद मोहनला सन २००७ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र एका वर्षानंतर पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.
बिहार सरकारने नुकतेच अटकेत असलेल्या कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलले आणि मोठ्या गुन्ह्यांतील २७ कैद्यांच्या सुटकेची अधिसूचना जारी केली होती. बिहार सरकारच्या निर्णयानंतर माजी खासदार आनंद मोहन सिंह याची तुरुंगातून सुटका झाली. आनंद मोहन याने शिक्षेच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते, मात्र आजपर्यंत कोणताही दिलासा न मिळाल्याने तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याची पत्नी लवली आनंद ही देखील लोकसभा खासदार होती, तर त्याचा मुलगा चेतन आनंद बिहारमधील शिवहारमधून आमदार आहे.
Bihar EX MP Anand Mohan Released from Jail