इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हुंडा घेणे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा असला तरी अजुनही हा गैरप्रकार समाजात सुरू आहे. आजही अनेक जण बिनधास्त मुलीच्या कुटुंबीयांकडे हव्या असलेल्या गोष्टींची मागणी करतात आणि मुलीकडील त्या वस्तू देतात सुद्धा. अशा प्रकारांमध्ये बरेचदा विवाहीत महिलेला अमानुष छळ सहन करावा लागतो. असाच एक प्रकार बिहारमधील गोपालगंज येथे उघडकीस आला आहे. हुंड्यासाठी पतीने स्वत:च्या पत्नीचा प्रचंड छळ केल्याची माहिती पुढे आली आहे.
बिहारमधील गोपालगंजमध्ये हुंड्यासाठी पती हैवान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीवर अत्याचार केले, नंतर तिच्या संपूर्ण शरीरावर गरम सळीने चटके दिले. महिलेला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सदर रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. महिलेच्या अंगावरील जखमा पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हथुआ पोलिस स्टेशन परिसरातील रुपनचक गावातील रहिवासी राज कपूर राम यांची मुलगी काजल कुमारी हिचा विवाह २१ मे २०२२ रोजी मांझा पोलीस स्टेशन परिसरातील फिश मार्केटमधील रहिवासी शिवजी राम यांचा मुलगा रंजन कुमार राम याच्याशी झाला होता.
लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून सासरच्या मंडळींना बुलेट आणि भेटवस्तू दिल्या होत्या. काजल कुमारी तिच्या सासरच्या घरी एक वर्ष राहिली, मात्र त्यानंतर काजलच्या पतीने हुंड्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने काजलचा सासरच्या घरात छळ सुरू झाला. शनिवारी संध्याकाळी काजल कुमारीला तिचा पती रंजन कुमार राम, सासरा शिवजी राम आणि सासू पूनम देवी यांनी घरात बेदम मारहाण केली. गर्भवती सुनेला मारहाण केल्यानंतर, सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर रात्री तिला जिवंत जाळण्याचा कट रचला गेला, याची माहिती मिळताच मुलीच्या भावाने तिचे घर गाठून पोलिसांत तक्रार केली.
महिलेच्या भावालाही केली मारहाण
काजल कुमारीच्या सासरच्या लोकांनी तिच्या भावालाही मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून मांझा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला, मात्र अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांच्याकडे केली आहे.
Bihar Crime Husband Pregnant Wife Dowry