नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपती बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, यासाठी कधीकाळी त्यांचे राजकीय सल्लागार राहिलेल्या प्रशांत किशोर यांनी पुढाकार घेतला आहे. याविषयी मंगळवारी देशातील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांवर चर्चा होताना दिसल्या. परंतु याबद्दल दस्तुरखुद्द नितीश कुमार यांना प्रश्न विचारताच ही बातमीच निराधार असल्याचे म्हणत त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार बनवण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, की याबद्दल मला काहीच ठाऊक नाही. तसेच कशाचीही कल्पना नाही. मात्र एनडीएमध्ये सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी नितीश कुमार यांना राष्ट्रपतिपदाचा उमेदवार बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. नितीश कुमार राष्ट्रपतिपदाचे उमेदवार झाले तर हा बिहारचा गौरव असेल, अशा प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
विविध चर्चांनुसार, पहिल्या टप्प्यात प्रशांत किशोर भाजप आणि काँग्रेस वगळून इतर पक्षांचा या मुद्द्यावर पाठिंबा मिळवण्याचे प्रशांत किशोर यांचे प्रयत्न आहेत. यावर त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पाठिंबा मिळवला आहे. ते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीसुद्धा भेट घेणार आहेत. प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवल्यानंतर प्रशांत किशोर काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील. यात ते यशस्वी झाले तर भाजपचे मन वळवण्याचा ते प्रयत्न करतील. सर्वांच्या संमतीने नितीश कुमार उमेदवार बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर दिवसभर या विषयावर चर्चा सुरू होत्या. परंतु प्रशांत किशोर यांनी हे वृत्त फेटाळेही नाही आणि त्याची पुष्टीही केली नाही. याच गोष्टीमुळे त्यांनी घेतलेल्या पुढाकाराला बळ मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी म्हणाले, की कोणत्याही मोठ्या पदासाठी नितीश कुमार लायक आहेत. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद म्हणाले, की आता राष्ट्रपतिपदासाठी कोणतेही रिक्त पद नाही. महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा उमेदवाराचा निर्णय विविध राजकीय पक्षांच्या सहमतीने सामुहिकरित्या घेतला जाईल. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने भाजपशी संबंध तोडले तरच त्यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो.