मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोणतीही संस्था असो की संघटना यामध्ये काम करतांना काही नियमावली असतेच, त्याचप्रमाणे बँक आणि शासकीय कार्यालयांमध्ये काही नियमावली करण्यात येते. तसेच या नियमांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतात, आता पुढील महिन्यापासून देखील काही नियमांमध्ये बदल होणार असून मात्र त्या बदलांचा थेट परिणाम नागरिक तथा ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
जून महिना संपत आला असून आता 5 दिवसात जुलै महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच दि. 1 जुलैपासून अनेक मोठे बदल होत आहेत, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे. कोणते बदल आहेत, ज्याचा परिणाम होईल चला जाणून घेऊ या…
पॅन-आधार लिंकिंग:
जर कोणी आधार-पॅन कार्ड अजून लिंक केले नसेल, तर आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे. आधार पॅनशी त्वरित लिंक करा. आधार पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. तसेच हे काम 30 जूनपूर्वी पूर्ण केले तर 500 रुपये दंड भरावा लागेल, परंतु त्यानंतर दुप्पट नुकसान भरावे लागेल.
क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस:
1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसणार आहे. पुढील महिन्यापासून सर्व क्रिप्टो व्यवहारांवर TDS लागेल. सन 2022-23 पासून क्रिप्टोकरन्सीजमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के भांडवली नफा कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून क्रिप्टो व्यवहारांवरही 1 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे.
AC होणार महाग :
पुढील महिन्यापासून एअर कंडिशनर महाग होणार आहेत. वास्तविक, BEE म्हणजेच ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ने एअर कंडिशनर्ससाठी ऊर्जा रेटिंग नियम बदलले आहेत. याचा अर्थ 1 जुलैपासून 5-स्टार AC चे रेटिंग थेट 4-स्टारवर जाईल. नवीन ऊर्जा कार्यक्षमतेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा परिणाम म्हणून, येत्या काही वर्षांत भारतातील AC च्या किमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
ऑफिसच्या वेळा बदलतील:
देशात 4 लेबर कोड लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दि. जुलैपासून कामगार संहितेचे नवीन नियम लागू होतील. त्याच्या अंमलबजावणीमुळे हातातील पगार, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा, पीएफ योगदान, ग्रॅच्युइटी इत्यादींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार कामाचे कमाल तास 12 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना 4 दिवसांत 48 तास म्हणजे दररोज 12 तास काम करावे लागेल. दर पाच तासांनी अर्धा तासाची विश्रांतीही कर्मचाऱ्यांना प्रस्तावित आहे.
एलपीजी किमतीत बदल:
गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या 1 तारखेला सुधारली जाते. सिलिंडरच्या किमती सध्या सातत्याने वाढत आहेत, ते पाहता 1 जुलै रोजी एलपीजीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
डिमॅट खाते केवायसी:
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे ट्रेडिंग खाते 30 जूनपर्यंत केवायसी करून घ्या. अन्यथा हे खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. असे झाल्यास 1 जुलैपासून तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करू शकणार नाहीत.
big rule changes from 1 July 2022 which are those economics