मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांसह अन्य वस्तूंचा जीएसटी मध्ये समावेश केला आहे. त्यामुळे उद्यापासून (१८ जुलै) या वस्तू व पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच आता एक दिलासादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे, जुलैच्या अखेर पर्यंत खाद्यतेलाच्या किंमती सुमारे २५ ते ३० रुपये प्रति लिटरपर्यंत घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
श्रावण महिना हा सणासुदीचा काळ असतो, या काळात किराणा वस्तू सह खाद्यतेलाच्या देखील किमती वाढतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र खाद्यतेलाच्या किमती वाढ मध्ये कपात होणार असल्याने सणावाराच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण दिसत आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट येईल. इतके नव्हे तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे.
काही महिन्यापूर्वी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे आणि एकूणच जगभरात महागाईचा दर वाढत असल्यामुळे मागील महिन्यात तेलाचे भाव भरमसाठ वाढले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या आणि धान्याच्या किमती वाढल्यानंतर सरकारने या वाढलेल्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने विविध पावले उचलली होती.
आपल्या देशातील विविध कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 रूपयांनी कमी केले आहेत. या दरांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत सरकारने तेलाच्या किमती किमान 15 ते 20 रूपयांनी कमी करण्याचे आवाहन कंपन्यांना केले होते. त्यानुसार तेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेल सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपन्यांनी गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या होत्या मात्र यात अजूनही त्यात कपात होऊ शकते असे सरकारचे म्हणणे आहे. त्या संदर्भात खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात तेलाचे दर कमी करण्याबाबत सांगितले आहे.
केंद्र सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेलाचे दर कमी होणार असून एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत सुमारे 30 रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले होते.
आपल्या देशाला एकूण गरजेपैकी 60 टक्के तेल हे बाहेरून आयात करावे लागते. मागील महिन्यात आयात तेलाच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली होती. पण आता या किमतींमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व कंपन्यांना तेलाच्या किमतीमध्ये कपात करण्यास सांगितले होते. सरकारच्या बैठकीनंतर देशातील अनेक राज्यासह महाराष्ट्रातही तेलाच्या किमती किमान 25 ते 30 रूपयांनी कमी होणार आहेत.
Big Relief to Common Man Edible Oil Prices will reduce soon