नवी दिल्ली : सोन्या चांदीच्या बद्दल प्रत्येकालाच आकर्षण असते, विशेषतः महिलांना सोन्या-चांदीच्या दागिन्याची अधिक आवड वाटते, मात्र राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याच्या किंमतीत ५०५ रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत दहा ग्रॅम ४६,५१८ रुपयांवर आली आहे.
अर्थ तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावर धातूंचे दर कमी झाल्याने देशांतर्गत पातळीवर ही घट नोंदविण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात सोन्याचे दर १० ग्रॅम ४७,०२३ रुपये होते. सोन्याच्या किंमतीतील घसरणीबरोबरच चांदीचे देशांतर्गत स्पॉट दरही बुधवारी खाली आले. बुधवारी चांदी ८२८ रुपयांनी घसरली. या पडझडीमुळे चांदी ६७,३१२ रुपये प्रतिकिलोवर आली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (वस्तू) तपन पटेल म्हणाले की, बुधवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या. अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीपूर्वी डॉलरच्या वसुलीमुळे सोन्याच्या किंमती दबावाखाली व्यापार करत आहेत.
मोतीलाल ओसवाल फायनान्शीयल सर्व्हिसेसचे व्हीपी (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, आठवड्याच्या पहिल्या दोन सत्रांत व्यापार स्थिर राहिल्यानंतर सोन्याच्या किंमती किंचित खाली आल्या आहेत. कालच्या सत्रात अमेरिकेच्या उत्पादनातील वाढीमुळे हे दर घटले आहे.