नवी दिल्ली – प्लांट बेस्ड पेय पदार्थांच्या (बदाम दूध, सोया दूध आणि आक्रोड दूध) कंपन्यांनी प्रचार सामग्री आणि लेबलवरून दूध किंवा मिल्क हा शब्द हटवावा असा निर्णय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) घेतला आहे. ई कॉमर्स कंपन्यांना ही उत्पादने दूध आणि डेअरी विभागातून हटविण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ आता अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, बिगबास्केट आणि ग्रोफर्ससारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डेअरी वर्गातून बदाम आणि सोया दूधासारखे पेय पदार्थ मिळणार नाहीत.
प्लांट बेस्ट पेय पदार्थांबाबत हा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. अनेक दिवसांपासून भारतीय डेअरी उद्योग क्षेत्र यासाठी अन्न नियामकांवर दबाव टाकत होते. चांगले दूध कोणते याबाबत काही प्रमाणात असेच वाद युरोप आणि अमेरिकेत सुरू आहेत. खरे दूध कोणते या भारतातील वादाची लढाई डेअरी उद्योगाने जिंकली आहे.
हँडबुक ऑफ फूड केमिस्ट्रीच्या माहितीनुसार, ज्या दूधात वसा, प्रथिने, एंजाइम्स, जीवनसत्वे आणि साखर असते, तेच खरे दूध होय. मुलांचे पोषण करण्यासाठी असे दूध सस्तन प्राण्यांमध्ये निर्माण होते. भारतीय अन्न नियामकांचेसुद्धा हेच म्हणणे आहे की, निरोगी सस्तन प्राण्यांमधून (दुभती जनावरे) निघणारे एक साधारण द्रव्य आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याला भलेही वेगळे नाव असेल. पण दुधाचा सस्तन प्राण्यांशी थेट संबंध आहे यावर सर्वांचेच एकमत आहे.
परंतु गेल्या एका दशकात सस्तन प्राण्यांशी काहीही देणेघेणे नसलेली अनेक अशी उत्पादने दूध किंवा मिल्क या शब्दाचा वापर करत बाजारात आली आहेत. अशा उत्पादनांमध्ये बदाम दूध, सोया दूध, आक्रोड दूध आणि ओट दूध यांचा समावेश आहे. हे दूध म्हणजे सुका मेवा आणि धान्याच्या प्रक्रियेतून बनविण्यात आलेले एक प्रकारचे द्रव्य असतात. ते दुधासारखेच दिसतात. या साखळीत आता बटाट्यासारखे पदार्थही जोडले गेले आहेत. हे सर्व वनस्पती किंवा रोपांमध्ये निर्माण झालेले पदार्थ आहेत. पण लोक त्यांना गाय किंवा म्हशीच्या दुधाला पर्याय म्हणून स्वीकारत आहेत.
सहाजिकच भारतातील डेअरी उद्योग या गोष्टीवर नाराज आहे. त्यामुळे नॅशनल कॉपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीडीएफआय) आणि गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ)कडून भारतीय अन्न नियामक संस्थेकडे तक्रार करण्यात आली. जीसीएमएमएफ ही संघटना देशभरात अमुलची उत्पादने पुरवठा करते. गेल्यावर्षीपासूनच या संस्था निर्णय घेण्याची मागणी करत होत्या.