मुंबई – देशात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणारे बदल दर महिन्यात होत असतात. तेच आता डिसेंबर महिन्यातही पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये एसबीआय कार्डधारक, एलपीजी गॅस सिलिंडरधारक तसेच इतर सेवांंमध्ये बदल होणार आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड महागणार
भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणे महाग होणार आहे. एक डिसेंबरपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणे महागणार आहे. एक तारखेपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरील प्रक्रिया शुल्क वसूल केले जाणार आहे. यापूर्वी फक्त व्याजाचीच वसुली केली जात होती. नव्या नियमानुसार क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करताना ईएमआय पर्यायावर बिल भरल्यास प्रत्येक खरेदीवर तुम्हाला ९९ रुपये अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार आहे. हेच ते प्रक्रिया शुल्क असेल.
एलपीजी गॅस सिलिंडर महागणार?
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. गॅस सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात किंवा वाढूही शकतात. आतापर्यंत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे किंवा त्या स्थिर राहिलेल्या आहेत. डिसेंबरमध्ये किमती वाढणार की कमी होणार हे पाहण्याबाबत उत्सुकता आहे.
गृहकर्ज महागण्याची शक्यता
काही बँकांनी सणासुदीच्या दिवसात गृहकर्जावर ऑफर दिल्या होत्या. व्याजदर कमी करण्यासह प्रक्रिया शुल्कावरही सवलत देण्यात आली होती. यातील काही ऑफर्स ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये गृहकर्ज महाग होण्याची शक्यता आहे.
यूएएन नंबर लिंक करण्याची अंतिम मुदत
यूएएन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर देण्यात आलेली आहे. जर तुमचा यूएएन नंबर आधारशी लिंक केला नाही, तर पीएफ खात्यात रक्कम जमा होणार नाही.