इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सगळ्यांचे अंदाज चुकवत आणि संभाव्य विजेत्यांना मागे टाकत एमसी स्टॅन हा बिग बॉस १६ व्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकल्यावर एमसी स्टॅनवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर स्टॅनने पुन्हा एकदा नवीन विक्रम केला आहे. यात स्टॅनने विराट कोहलीला आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे.
रॅपर एमसी स्टॅनची खरी लोकप्रियता किती आहे, याचा अंदाज काही दिवसांपासून अनेकांना आला असेल. बिग बॉसच्या घरात असताना सुरुवातीला त्याने विशेष कामगिरी केली नव्हती. इतकंच नव्हे तर सतत घरी जाण्याचा हट्टही त्याने केला होता. मात्र ग्रँड फिनालेपर्यंत टिकून आणि विजेतेपद मिळवून स्टॅनने आपली लोकप्रियता सिद्ध केली. त्याच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. अशा लोकांमुळे मला काही फरक पडत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया स्टॅनने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर दिली. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने सोशल मीडियावर सर्वांत आधी विराट कोहलीचा आणि त्यानंतर शाहरुख खानचा विक्रम मोडला.
विराटपेक्षा जास्त प्रतिसाद
बिग बॉसचं १६ वं पर्व संपलं तेव्हा साधारण एकाच वेळी एमसी स्टॅन आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या. एमसी स्टॅनने त्याचा बिग बॉसची ट्रॉफी घेतलेला फोटो पोस्ट केला तर विराट कोहलीने भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. एकाच वेळी टाकलेल्या त्या पोस्टवर विराटला २० लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला ६० लाख लाईक्स होते. खरं तर विराट इंस्टाग्रामवर भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्या पोस्टला सर्वाधिक लाईक आणि कमेंट्स असतील असं सर्वांना वाटत होतं. पण, स्टॅनने हा अंदाज चुकवला.
बिग बॉस जिंकल्यानंतर स्टॅन पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. तो फक्त १० मिनिटांसाठी लाइव्ह आला. यादरम्यान त्याने त्याच्या चाहत्यांसाठी लाइव्ह गाणीसुद्धा गायली. एमसी स्टॅनला लाइव्ह आल्याचं पाहताच त्याचे चाहते आणि बरेच सेलिब्रिटीसुद्धा या लाइव्हला जोडले गेले. आणि पुन्हा एकदा स्टॅनने नवीन विक्रम रचला. स्टॅनच्या या लाइव्हमध्ये जितके चाहते जोडले गेले, तितके शाहरुख खान आणि विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटींच्या लाइव्हलाही जोडले जात नाहीत. सोशल मीडियावर एमसी स्टॅनच्या या लाइव्हचे व्ह्यूज तब्बल ५ लाख ४१ हजार इतके झाले होते. अवघ्या काही मिनिटांत व्ह्यूजचा इतका मोठा आकडा गाठणारा स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. या नव्या विक्रमासह एमसी स्टॅनने शाहरुख खानला मागे टाकले आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर २ लाख ५५ हजार व्ह्यूज आले आहेत.
स्टॅनने नव्या टूरची केली घोषणा
रॅपर आणि ‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅनने संपूर्ण भारतात दौर्याची घोषणा केली आहे. त्याच्या पॅन इंडिया टूरची घोषणा होताच मुंबई आणि पुण्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली. बिग बॉसच्या आधी आणि नंतर एमसी स्टॅनची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज आपल्याला येतो. सध्या एमसी या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
https://twitter.com/ItsTeamMCStan/status/1626456064391782400?s=20
Big Boss Winner MC Stan New Record