बुलडाणा – कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉसमध्ये दाखल झाल्याने त्यांच्यावर वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ वारकरी तसेच कीर्तनकार नाराज आहेत. याप्रकरणी अखेर पाटील यांनी वारकरी संप्रदायासह वरिष्ठांची माफी मागितली आहे. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कीर्तनात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. अधिक गर्दी जमविण्यात आली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. म्हणून आयोजक संदीप राऊत, गणेश मोरे, किशोर पोफळकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.