मुंबई – भारतीय संस्कृतीत शेजार धर्माला खूप महत्त्व आहे, आपल्या शेजारी कोण राहतो? यावरून एखाद्या व्यक्तीची ओळख निर्माण होते. त्याचप्रमाणे अडचणीच्या प्रसंगी शेजारीच आपल्या मदतीला धावून येतात. परंतु एखादा प्रसिद्ध व्यक्ती किंवा सेलिब्रिटीज आपला शेजारी किंवा घर मालक असेल तर असेल तर याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
हिंदी चित्रपट मेगा स्टार अमिताभ बच्चन यांचे शेजारी असणे कोणासाठीही अभिमानाची बाब असू शकते. परंतु त्यांच्या शेजारी स्थायिक होण्याचे भाडे इतके आहे की सामान्य माणूस ते करण्याची हिंमत करू शकत नाही. अमिताभ बच्चन हे त्यांच्या घराशेजारीच असलेला त्यांचाच दुसरा बंगला भाड्याने देण्यासाठी भरमसाठ पैसे आकारत आहेत. आता यावेळी ही जागा दरमहा सुमारे 19 लाख रुपये भाड्याने देण्यात आली असून यासाठी पुढील १५ वर्षांसाठी करारही करण्यात आला आहे. ही जागा आता एका बँकेने भाड्याने घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी देखील इथे एक दुसरीच बँक चालत असे.
मुंबईतील सर्वात पॉश क्षेत्रांपैकी एक असलेल्या जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांचे अनेक बंगले आहेत, येथे अमिताभ बच्चन आपल्या पालकांसोबत वर्षानुवर्षे राहिले असून त्यानंतर ते सध्या जलसा या दुसऱ्या बंगल्यात राहत असून त्यांची सरस्वती पिक्चर्स फिल्म कंपनीचे कार्यालय जलसाच्या मागे जनक नावाच्या बंगल्यात आहे. जलसा जवळ आणखी एक बंगला असून तेथे पूर्वी सिटीबँक दोन वर्षांपूर्वी काम करत असे. या जागेची मालकी अमिताभ बच्चन यांच्याकडे असल्याचेही सांगितले जाते.
कोरोना संक्रमण कमी झाल्यामुळे, मुंबईतील विविध व्यावसाय पुन्हा सुरू झाले आहेत. तसेच नवीन चित्रपट, वेब मालिका आणि दूरचित्रवाणी मालिकांचे काम पुन्हा पुर्ववत सुरू झाले आहे. यासोबतच मुंबईच्या अंधेरी, जुहू इत्यादी भागात भाड्याचे दरही वाढू लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे विविध आर्थिक उपक्रम त्याच ठिकाणी सुरू होत आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत या जागेसाठी १५ वर्षांच्या लीज आणि लीव्ह करारावर स्वाक्षरी केली आहे.
अमिताभ बच्चन यांना भाड्याने दिलेला सदर बंगला सुमारे १५ वर्षांसाठी भाड्याने दिला असून दर पाच वर्षांनी २५ टक्के दराने वाढेल. पहिल्या पाच वर्षांत हे भाडे मासिक १८ लाख ९० हजार रुपये असेल, नंतर पुढील पाच वर्षांसाठी हे भाडे २३ लाख ६२ हजार ५०० रुपये असेल आणि त्यापुढील पाच वर्षे हे भाडे २९ लाख ५३ हजार रुपये असेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी २.२६ कोटी रुपयांचे आगाऊ पैसेही दिले असून ते पहिल्या एका वर्षाचे भाडे असल्याचे सांगितले जाते.