विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी दान केलेल्या कोट्यवधी रुपयांमुळे सध्या शीख राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. या सगळ्या परिस्थितीत आता एक नवीन वळण आले आहे. अमिताभ यांचे १० वर्षांपूर्वीचे एक पत्र समोर आले आहे. यात त्यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळत आपली बाजू स्पष्ट केली आहे. हे कथित पत्र आता समोर आले असून इंटरनेटवर व्हायरल होते आहे.
शीख हत्याकांडासाठी गर्दीला उकसवण्याचा आरोप अमिताभ बच्चन यांच्यावर आहे. या कथित पत्रात त्यांनी याला उत्तर दिले आहे. हे आरोप फेटाळणारे पत्र २०११ मध्ये त्यांनी अकाल तख्त साहेब यांना लिहिले आहे. शीखांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवण्याचा विचारही मी करू शकत नाही, असे अमिताभ यांनी या पत्रात लिहिले आहे. विशेष म्हणजे, दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापक समितीला १२ कोटी रुपये दिल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य गुरिंदर सिंह बावा यांच्या माध्यमातून हे पत्र अमिताभ यांनी अकाल तख्त साहेब यांच्याकडे पाठवले.
अमिताभ बच्चन यांनी अत्यंत विनम्रतेने आणि दु:खी अंत:करणाने हे पत्र लिहिले आहे. १९८४ च्या शीख विरोधी दंगलीत सहभागी होण्याचा खोटा आरोप माझ्यावर लावला जात आहे. या आरोपामुळे मला फार दु:ख झाले.
खालसा पंथाचे जन्मस्थान श्री आनंदपूर साहेब येथे ऐतिहासिक खालसा विरासत कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी अमिताभ बच्चन यांना पंजाब सरकारने बोलावणे पाठवले होते. त्यावेळी अमिताभ यांनी हे पत्र लिहिले होते. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले होते, आणि ते या कार्यक्रमाला उपस्थितही राहणार होते. पण, आपल्यावर लावण्यात आलेले आरोप पाहता, तेथे जाऊन त्यांना कोणत्याही वादाला कारणीभूत ठरायचे नव्हते, यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
नेहरू – गांधी परिवाराशी नेहमीच माझे चांगले संबंध आहेत. सुख दु:खाच्या प्रसंगी आमचे परस्परांकडे येणे जाणेही असते. असे असले तरीही शीख समुदायाविरोधात काहीही करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. शीख विरोधी दंगल ह देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचेही अमिताभ यांनी म्हटले आहे.
ही मदत स्वीकारल्याबद्दल दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापक समितीविरोधातही अनेकांमध्ये नाराजी आहे. यासंबंधात मनजीत सिंह यांनी अकाल तख्त साहेब यांना एक पत्रही लिहिले होते. यात शीख समुदायाच्या विरोधातील व्यक्तीकडून दान स्वीकारल्याबद्दल टीका करण्यात आली आहे.