नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शासकीय तांत्रिक व वाणिज्य विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळा येथे अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत संस्थेच्या संलग्न विद्यालयातून विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी द्विलक्षी अभ्यासक्रमाची निवड करावी, अशी माहिती शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक बाविस्कर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, शासकीय तांत्रिक महाविद्यालयात बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी एकुण 250 जागा भरण्यात येणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय अभ्यासक्रमा करिता 50, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अभ्यासक्रमा करिता 100, मेकेनिकल मेंटेनन्स अभ्यासक्रमा करिता 100 विद्यार्थी संख्या असणार आहे. नाशिक शहरातील भोसला मिलिटरी कॉलेज, गंगापूर रोड, बिटको कॉलेज, नाशिक रोड, लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेज, पंचवटी, आर. वाय. के कॉलेज, कॉलेज रोड, वाय. ई. डब्ल्यू. एस (यूज) नॅशनल हायस्कूल अॅड ज्युनियर कॉलेज, सारडा सर्कल ही पाच कनिष्ठ महाविद्यालये शासकीय तांत्रिक विद्यालयाशी संलग्न आहेत.
या अभ्यासक्रमांतर्गत अकरावी प्रवेशात एक भाषा आणि एक वैकल्पिक विषय या ऐवजी द्विलक्षी अभ्यासक्रमाचे दोनशे गुणांच्या विषय घेण्यात येतात. तसेच प्रात्यक्षिकांवर 50 ते 60 टक्के भर असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त होवून पुढील तांत्रिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्यास मदत होते. इयत्ता बारावी नंतर विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास बायफोकल विषयांचा अभ्यास खूप उपयोगी ठरतो. तसेच शासन निर्णयानुसार पुढील वर्षापासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि सीईटी ला मिळालेले गुण हे समप्रमाणात 50% ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बायफोकल अभ्यासक्रमाचा निश्चितच फायदा होणार आहे.
वरील संलग्न महाविद्यालयातून सर्व प्रवेश जागांवर शासन नियमानुसार शंभर टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक दिपक बाविस्कर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Bifocal Syllabus admission process Started