चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. गणेशपुर पिंपरी येथे ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचे रिंकेश नंदू मोरे हे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, रिंकेश हा गणेशपूर – पाटणा रस्त्यावर काही मित्रांसोबत रनिंगसाठी गेला होता. रनिंग करत असतांना चार जण पुढे गेले. पण, रिंकेश मागे राहिला. त्याचवेळेस शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला गेला. त्यानंतर शेतात ओढून नेले. आपला मित्र मागे दिसत नसल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याची शोधाशोध सुरु केली. पण, तो मिळून आला नाही.
या घटनेची माहिती त्यानंतर या चार मुलांनी रिंकेशच्या घरी सांगितली. त्यानंतर आई वडीलांनी रिंकेश शोध सुरु केला. त्यानंतर प्रकाश काशिनाथ पाटील यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी सकाळी बिबट्याने बकरी फस्त केली होती. त्यानंतर सायंकाळी ही घटना घडली.