मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड म्हणजे हिंदी चित्रपटातील कलाकारांची लक्झरी लाईफस्टाईल नेहमीच सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. तसेच बॉलिवूड चित्रपट बिग बजेटमुळे सतत चर्चेत राहतात. हे कलाकारसुद्धा अफाट मानधन घेऊन चर्चेत असतात. परंतु काही टीव्ही शो देखील आहेत, जे त्यांच्या बिग बजेटमुळे चर्चेत राहतात. यापैकीच एक शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय.
शोचे पूर्वीच्या अनेक सीजन सलमान खानने होस्ट केले आहेत. हा शो म्हणजे सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल. मोठ्या पडद्यासोबतच सलमान खानने छोट्या पडद्याच्या माध्यमातूनही प्रेक्षकांशी घट्ट नाते जोडले आहे. दरम्यान या शोसाठी अभिनेत्याची फीसुद्धा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. तत्पूर्वी एका रिपोर्टनुसार, अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस 16’ साठी त्याच्या आधीच्या फीपेक्षा 3 पट जास्त फी मागितली आहे.
बिग बॉस आणि सलमान खान यांचे नाते जुने असून या शोचे अनेक सीजन त्याने होस्ट केले आहेत. प्रेक्षकांनासुद्धा त्याला ‘बिग बॉस 16’ होस्ट करताना पाहायचे आहे. सलमान खानने सीजन 15 साठी 350 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती. त्यानुसार, हिशोब करायचा झाला तर सीजन 16 साठी 1000 कोटींहून अधिकची मागणी करत आहे.
सलमान खानच्या मानधनाच्या अनेक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉस या शोची लोकप्रियता पाहता सलमानने पुन्हा एकदा नव्या सिझनसाठी फी वाढवल्याचे कळते. सलमान खान गेल्या 13 वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. तो शो सोडणार असल्याचे अनेकदा चर्चा होते पण तसे कधीच झाले नाही. आता यावर्षी हा शो सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होईल.
सलमानने निर्मात्यांना सांगितले की, त्याला गेल्या तीन सीझनमध्ये त्याच्या फीमध्ये कोणतीही वाढ मिळालेली नाही आणि यावेळी तो जोपर्यंत जास्त फी मिळत नाही तोपर्यंत तो शो होस्ट करणार नाही. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही योग्य माहिती मिळालेली नाही. या संपूर्ण सीझनचे आयोजन करण्यासाठी निर्मात्यांना सलमानला एकूण 1050 कोटी रुपये द्यावे लागतील. सलमानने ‘बिग 15’ होस्ट करण्यासाठी 350 कोटी रुपये घेतले होते. मात्र, अद्याप या बाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सध्या सलमान त्याच्या तेलुगू डेब्यू चित्रपट ‘गॉडफादर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो त्याच्या बॅनरखाली ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यामध्ये तो स्वतःही अभिनय करताना दिसणार आहे. याशिवाय ‘वेद’ या मराठी चित्रपटात कॅमिओ रोल आणि आगामी चित्रपटांमध्ये ‘पठाण’ आणि ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे.
बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात याचाही अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. अर्जुन बिजलानी, मुनव्वर फारुखी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टिना दत्ता, अझमा फलाल, शिवम शर्मा, जय दुधाणे, मुनमुन दत्ता, जन्नत झुबैर, फैसल शेख, आरुषी दत्ता, पूनम पांडे, झैन दरबार या नावांची चर्चा आहे.
Bib Boss Season 16 Salman Khan demand Payment