मुंबई – बॉलिवूड महानायक अमिताब बच्चन यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ते आपल्या पहिल्या एनएफटीचे १ नोव्हेंबरला अनावरण करणार आहेत. एनएफटीच्या माध्यमातून लिलाव करून ते काही पैसे जमवणार आहेत. परंतु ही एनएफटी काय भानगड आहे आणि अमिताभ बच्चन कोणत्या वस्तूंचा लिलाव करणार आहेत, हे समजून घेऊयात.
एनएफटी म्हणजे काय
एनएफटी म्हणजे नॉन फंजिबल टोकन. ज्या मालमत्तांचा व्यवहार कॅश किंवा ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकत नाही त्यांना नॉन फंजिबल असे म्हणतात. हा व्यवहार पूर्णपणे व्हर्च्युअल केला जातो. एनएफटी डिजिटल संपत्ती असते, तिला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने सांभाळले जाते. डिजिटल करन्सीच नव्हे, तर कोणत्याही वस्तूला डिजिटल बनवून तिची नोंदणी ठेवणे याला ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटो, व्हिडिओ आणि इतर महागड्या डिजिटल मालमत्तांचा मालकी हक्क सुनिश्चित केला जातो.
अमिताभच्या कलेक्शनमध्ये काय
एनएफटीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन ज्या वस्तूंचा लिलाव करणार आहेत, त्यामध्ये शोलेसारख्या जुन्या चित्रपटांच्या पोस्टरचा समावेश आहे. या पोस्टरवर अमिताभ यांची स्वाक्षरी आहे. त्याशिवाय वडील हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या कवितासंग्रहाच्या ऑडिओ व्हर्जनचा लिलावही करणार आहेत. या ऑडिओमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे. तुम्ही अमिताभ बच्चन यांचे चाहते असाल तर त्यांच्या आवाजातील या ऑडिओ व्हर्जनचे मालक होऊ शकतात. या लिलावात विशेष लूट बॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. या लूटबॉक्सच्या प्रत्येक ग्राहकाला अमिताभ यांच्या लिलाव होणार्या वस्तूंच्या कलेक्शनमधील एक आर्टपीस मिळणे निश्चित आहे. त्याची किंमत १० डॉलर (७५० रुपये) निश्चित करण्यात आली आहे. त्याचा तपशील https://amitabh.beyondlife.club/ या लिंकवर तुम्हाला मिळू शकेल.