ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही खासगी किंवा सरकारी कार्यालय तथा कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणे हा त्यांचा हक्क असतो. परंतु बऱ्याच वेळा वरिष्ठ अधिकारी त्यांना सुट्टी देत नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्याचा हिरमोड होतो, काही वेळा महत्त्वाचे काम असते परंतु सुट्टी न मिळाल्याने कर्मचारी रागाच्या भरात काय करू शकतो, याचे एक वाईट उदाहरण नुकतेच मुंबईतील एका मॉलमध्ये घडले.
सुटी नाकारली
आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने सुट्टी न दिल्याने संतप्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याने एक संतापजनक कृत्य केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या संतप्त महिला कर्मचारीने भाईंदरच्या डी-मार्टमध्येच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय महिलेवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी भाईंदर पश्चिमेच्या मुख्य डीपी रोडवरील डी मार्टमध्ये कामाला होती. तिला काही महत्वाच्या कामासाठी सुट्टी हवी होती मात्र व्यवस्थापनाकडून सुट्टी नाकारण्यात येत होती. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून नाराज होती. तिने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला. मात्र तिची सुट्टी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या भरात तिने हे वाईट कृत्य केले.
आगीत एवढे नुकसान
महत्त्वाचे काम असूनही आपल्याला सुट्टी मिळत नाही यामुळे त्या महिला कर्मचाऱ्याचा राग खूपच अनावर झाला होता. त्यामुळे या संतप्त महिलेने रागाच्या भरात डीमार्ट मधीलपहिल्या मजल्यावरील कपडे आणि खेळणी ठेवलेल्या भागाला चक्क आग लावली. आग लागल्याने डी मार्ट मध्ये एकच घबराट पसरली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत सुमारे २० हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्टोर व्यवस्थापक यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकारामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.