नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या पाइपलाइनद्वारे राख मिश्रित पाणी सोडून तेथील सिंचन योजना उध्वस्त होत असल्याने या प्रकरणाची व्यवस्थापकीय संचालक किंवा संचालक यांच्यामार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
या संदर्भातील लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली होता, या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांचे युनिट क्रमांक तीनची प्रकल्प मर्यादा संपलेली असूनही या केंद्रातून वीज निर्मिती होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यातील प्रस्तावित रिंग मेट्रो प्रकल्प स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच
ठाणे शहराच्या मंजूर आराखड्यातील वर्तुळाकार (रिंग) मेट्रो प्रकल्प स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य निरंजन डावखरे यांनी या रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होते. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री.सामंत बोलत होते.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ठाण्यातील प्रस्तावित हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रुट तसेच डी.पी रस्त्यांवर शहरांतर्गत मेट्रो ट्रेन होणार आहे. त्यासाठी मार्च २०१९ मध्ये १३ हजार ९५ कोटी खर्चाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष आराखडा तयार केल्यानंतर त्यांची किंमत १० हजार ४१२ कोटी झाली. या प्रकल्पातील ३ किलोमीटरचा प्रस्तावित भूमिगत मार्ग आहे. त्याठिकाणी उन्नत मार्ग करावा की नाही, याबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चाही केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानुसार या प्रकल्पासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येईल. हा प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊन केला जाईल, अशी माहिती देखील मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सभागृहात दिली.
Bhusawal Thermal Power Station High Level Enquiry
Thane Proposed Metro Ring Project Rail