नवी दिल्ली – भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारा निर्णय घेऊन गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड केली आहे. भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजातून येतात. निवडणुकीपूर्वी पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे. पटेल हे इतर नेत्यांपेक्षा कमी चर्चेत राहिले आहेत. पटेल समाजाच्या नेत्यांमध्ये वर्चस्वावरून गटबाजी सुरू असल्यानेही हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची पसंती असून, माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही निकटवर्तीय आहेत.
गुजरात भाजपने सलग दोन दिवस आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले. पहिला विजय रुपाणी यांचा शनिवारी राजीनामा घेणे आणि रविवारी भूपेंद्र पटेल यांना नवा नेता निवडणे. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भूपेंद्र पटेल आमदार आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या पार पडल्या. मात्र ते कधीही चर्चेत नव्हते तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही नव्हते. आनंदीबेन पटेल राज्यपाल झाल्यानंतर त्याच जागेवरून ते आमदार झाले आहेत. राज्यातील सामाजिक समीकरणे सुरळीत करून निडणुकीला सामोरे जाण्यासह पाटीदार समाजाच्या वरिष्ठ नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढाईतून सुटका करून घेण्याचे भाजप नेतृत्वाचे प्रयत्न आहेत. उपमुख्यमंत्री नितीन पाटील, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, सौरभ पटेल आणि जितू वाघनी या नेत्यांऐवजी भूपेंद्र पटेल यांनी निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल यांनाही निवड झाल्याचे अगदी शेवटच्या क्षणाला कळाले. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीसुद्धा भूपेंद्र पटेलांना पसंती दिली.
भूपेंद्र पटेल यांना पक्ष संघटनेत खूप मोठा अनुभव आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना राज्याचा गाडा हाकताना जास्त अडथळे येणार नाहीत. नवा चेहरा असल्याने त्यांची पाटीदार समाजातही चांगली प्रतिमा आहे. भाजप नेतृत्वालाही कोणत्याही पद्धतीने नकारात्मक प्रतिमेचा सामना करावा लागणार नाही. कोरोना काळात सध्याच्या भाजप सरकारविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे नवा चेहरा समोर आणून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भूपेंद्र पटेल हे कडवा पटेल आहेत. गेल्या वेळी सौराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ झाला होता. आता तिथे पक्षाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
जूनमध्येच झाला होता निर्णय
भूपेंद्र पटेल यांच्या निवडीसाठी तीन महिन्यांपूर्वी जमीन तयार होत गेली. जूनमध्ये खोडलधाम म्हणजेच पाटीदार समाजाच्या कूळ देवीच्या मंदिरात लेऊवा आणि कडवा या पाटीदार समाजाच्या दोन गटाने २०२२ सालच्या निवडणुकीबाबत चर्चा करून पुढील मुख्यमंत्री पाटीदार समाजाच होणार असल्याचा निर्णय घेतला. खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष नरेश पटेल यांनी ही घोषणा केल्यानंतर गुजरातमधील राजकीय वातावरण तापले होते. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल यांना सूत्रे दिल्याने ही घटना पाटीदार समाजाच्या मतांशी जोडली जात आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी पाटीदार आंदोलनामुळे भाजपासमोर समस्या निर्माण झाली होती.