मुंबई – छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना जामीन मिळावा, यासाठी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ आपल्या बंगल्यावर तासनतास बसलेले असायचे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ यांनी पाटील यांचा दावा खोडतांना सांगितले की, याचना करणे आमच्या रक्तात नाही. माझ्याआधी माझ्या पुतण्याला अटक झाली, मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कसा जाईल. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे बोलणं मूर्खपणाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, माझा मुलगा पंकजला समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग यांनी कोणता पुतण्या शोधून काढला ? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थितीत केला. यावेळी त्यांनी समीर भुजबळ कधीही चंद्रकांत पाटील यांना भेटले नाहीत असेही सांगितले. यावेळी भुजबळ म्हणाले की, ममता बंगालसाठी ममता झाशीच्या राणीसारख्या लढल्या. एकूणच काय तर हवा बदलत आहे. मी फक्त एवढेच म्हणालो होतो. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला नाकारले नाही तर नाकच कापले आहे असेही सांगितले.