नाशिक – कोरोनाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार असून विकेंड लॉकडाऊनही कायम राहणार असल्याचे सांगितले. केवळ मंगलकार्यालय आणि लॉन्सचालकांना शनिवार, रविवार ५० लोकांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजेपर्यंत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी कोरोना स्थितीबाबत माहिती देतांना सांगितले की, ३ जूनला ७५९१ ऍक्टिव्ह रुग्ण होते, आज ११ जूनला ४५९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहे.आठवड्याभरात रूग्णसंख्या ३ हजारने कमी झाली आहे. जिल्ह्यातील पॅाझिटिव्हिटी दर ५.८३ टक्के तर जिल्ह्यातील मृत्यदर १.०५ टक्के आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा कायम असून इंजेक्शनची मागणी अधिक पुरवठा मात्र अगदी कमी असल्याचे सांगितले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असण्याची शक्यता, त्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तयार केला आहे. ९५ टक्के मुलं घरीच उपचार घेऊन बरे होतील, तर ५ टक्के मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागतील, अशी तयारी करण्यता आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेत इतर प्रश्नांवर बोलतांना ते म्हणाले की, वारीवरून ज्यांना राजकारण करायचंय, त्यांना थांबवू शकत नाही. मंत्रिमंडळ मधील जे मंत्री आहेत. त्यांचे घरचे ही वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. वारकरीची काळजी घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. यावेळी त्यांनी प्रशांत किशोर व शरद पवार यांच्या भेटीच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, ही भेट हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी तर नक्कीच नाही. निश्चितपणे काही चर्चा झाली असेल. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर सांगितले की, संभाजी राजे समतोल विचार करणारे आहे. ते योग्य निर्णय घेतील. यावेळी त्यांनी नक्षलवादी पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना सांगितले की, मी काही ते पत्र वाचलेलं नाही, मराठा समाज समजदार, सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजायला लागल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.