नाशिक – परंपरागत इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत आहे याच बरोबर वाढत्या इंधन दरवाढ यामुळे देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचाच विचार करत भुजबळ नॉलेज सिटी, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल व्हेईकल ची निर्मिती केली आहे. पर्यावरण पूरक असलेल्या वाहनामुळे पर्यावरण संवर्धनासाठी देखील मदत होणार आहे.
भुजबळ नॉलेज सिटी अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या निशांत ठोसर, गणेश कोकणे, प्रतीक मेहत्रे, प्रणव बनकर, सागर पोकळे आणि ललित पाटील या विद्यार्थ्यांनी 50 एंपियर व 48 वोल्ट लिथियम आयन बॅटरी चा वापर करत 1.5 किलोवॅट, बी एल डी सी मोटर चा वापर करतात चार चाकी इलेक्ट्रिकल निर्मिती केली. या गाडीची बॅटरी चार्जिंग साठी साधारणतः चार तास लागतात, त्यासाठी तीन ते चार युनिट वीज खर्च होते. एक वेळा चार्ज केल्यावर ही गाडी साधारण 40 किलोमीटर अंतर कापू शकते अशाप्रकारे साधारण वीस रुपयात ही गाडी 40 किलोमीटर धावणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
वाहनात लागणाऱ्या बॅटरी चार्जिंग सिस्टम ची निर्मिती संस्थेच्या कार्यशाळेत करण्यात आली तसेच गाडीची डिझाईन ही विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केली. बॅटरी आणि कंट्रोल यंत्रणेसाठी गाडीमध्ये विशिष्ट जागा म्हणजेच बॅटरी बॉक्स डिझाईन करण्यात आला आहे यामध्ये बॅटरी कंट्रोलर कूलिंग सिस्टम ब्रेकिंग सिस्टम स्थापित करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रो. अभिलाष नेटके, विद्युत विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. पी. कदम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे प्राचार्य डॉ. वी. पी. वाणी यांनी विद्यार्थ्यांना सतत सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आणि येणाऱ्या काळात संस्था अशाच प्रकारचे नवनवीन प्रोजेक्ट वर काम करून समाजात आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम सतत सुरु ठेवेल अशी खात्री व्यक्त केली. संस्थेच्या मेंटर सन्माननीय डॉ. शेफाली भुजबळ यांनी याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, प्रसंगी त्यांनी अशा प्रकारच्या नवीन प्रोजेक्ट ची समाजाच्या प्रगतीसाठी गरज असल्याचे मत प्रदर्शित केले.