पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथे अचानक प्रकृती बिघडल्याने मंत्री छगन भुजबळ यांना विशेष विमानाने मुंबई येथे आणलं. त्यानंतर तातडीने त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आज पुणे येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी होणार होती. पण, त्यांचा पुणे दौरा रद्द झाला. या कार्यक्रमांसाठी भुजबळ पुण्यात गेले होते. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. त्यात त्यांची तब्येत बिघडली.
भुजबळ यांची प्रकृती स्थिर
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते. ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने दुपारी पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे भुजबळांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
नाशिकमध्ये शनिवारी सुध्दा कार्यक्रम
शनिवारी त्यांच्या संकल्पनेतून नाशिक येथील मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे शनिवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात करण्यात येणार आहे.