मुंबई – विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कालच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह महाविकास आघाडीच्या नेते भेट घेणार होते. पण, ही भेट रद्द करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. त्यामुळे भेटीचा विषय चांगलाच रंगला. त्यावरुन आरोप – प्रत्यारोपही झाले. त्यानंतर राज्यपाल यांनी भेटीसाठी १ सप्टेंबर ही वेळ दिली. पण, आज दिल्लीत या भेटीअगोदर महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची अचानक राज्यपालांची भेट झाली. राज्यपाल आज महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. भुजबळही दिल्लीतच होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची ही सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आवो भुजबलजी, महाराष्ट्र का बल भुजबल असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांचे स्वागत केले. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. १२ आमदारांच्या नियुक्तीचा निघाला का हे मात्र पुढे आले नाही. पण, ही भेटही चर्चेची ठरली..