मुंबई -राज्यात ओबीसींचे स्थगित झालेल्या आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत सार्वत्रिक नेतृत्व केले पाहिजे आणि आरक्षण टिकविले पाहीजे असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केले. ओबीसींच्या स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणाप्रश्नी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली व दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी आरक्षणा बाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की आमचा उद्देश हा ओबीसी आरक्षण टिकावे असा आहे. आदरणीय पवार साहेब हे मुख्यमंत्री असताना ओबीसींना आरक्षण मिळाले. काॅंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ भुमिका घेत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ओबीसी आरक्षणाच्या पाठीमागे मजबुतीने उभे आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा करण्यासाठी मी गेलो होतो. त्यांचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध नाही त्यामुळे सर्व स्थरातून आरक्षणासाठी प्रयत्न झाले पाहिजे.ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डाटा मिळावा यासाठी कोण कोणते पर्याय आहेत यावर देखील आमच्यात चर्चा झाली.
ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न करण्याची माझी तयारी असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केले. आणि यासाठीच नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी जरी केले तरी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्य सरकार हे केंद्राने इंपेरिकल डाटा द्यावा यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. कपील सिब्बल यांच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. केंद्राने आम्हाला डाटा द्यावा अशी आमची सातत्याने मागणी आहे. मात्र यासाठी वाद विवाद, वितुष्ट बाजूला ठेऊन काम करण्याची गरज असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा शरद पवार हे सातत्याने आरक्षणाच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे असे देखील मत छगन भुजबळ यांनी मांडले.