नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. यावेळी ते म्हणाले की, मला मंत्रिपद मिळाले की नाही, हा प्रश्न नाही. ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी नाराज आहे. पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं, ते म्हणाले की निवडणूक लढवायची, असा सवाल विचारत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तुम्ही लढावे यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती. तेव्हा चांगले वातावरणही तयार झाले होते. मात्र, एेनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत.च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हादेखील मी शांत बसलो, मी तेव्हा सांगितले होतं की, राज्यसभेवर माझ्या अनुभवाचा फायदा होईल. पण, तेव्हा मला सांगण्यात आले की तुम्ही महाराष्ट्रात असणे गरजेचे आहे. मात्र, आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल. पण, मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांनी खडे बोल सुनावले.
पण, आता मी निवडणूक लढलो आहे. आता कुठे निवडणूक संपली आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. निवडणुकीत माझ्यासाठी माझ्या लोकांनी जीव काढला. मी त्यांना काय सांगू, मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक दोन – वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो असे सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण, ते कधी चर्चेला बसले नाहीत, असा थेट आरोप छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा मंत्रिमंडळात प्रवेश व्हावा यासाठी आग्रही असल्याचा गौप्यस्फोट सुध्दा केला.