इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप आहे. आज या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हो मी नाराज आहे. मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करतांना सांगितले की, मी सामान्य कार्यकर्ता आहे. अजित पवारांसोबत चर्चा केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मला का घेतलं नाही ते त्यांना विचारा. मी मतदार संघातील कार्यकर्त्यांबरोबर व समता बरोबर चर्चा करुन निर्णय घेईल असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे छत्रपती संभाजी नगर – नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे आज रास्ता रोको करण्यात आला. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला.
कालही नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी टायर जाळत निषेध व्यक्त केला. भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतले नाही याचे स्पष्टीकरण अद्यापही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे ही खदखद वाढत असून त्यामुळे ठिकठिकाणी भुजबळ समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.