नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छगनराव भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत साकडे घातले आहे.
छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते असून नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी दरम्यान तेही मंत्री पदाची शपथ घेणार आहे. तसेच भुजबळ हे जेष्ठ असल्याने त्यांनी सर्वाधिक वेळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविल्याने त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे. २०२७ मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा होत असून यामुळे जागतिक पातळीवर नाशिकचे नाव चर्चिले जाणार आहे. भुजबळ हे पालकमंत्री असताना कुंभमेळा झाला होता. यात त्यांनी केलेले यशस्वी नियोजन व विकासकामे आज ही आठवणीत आहे. मागील कुंभमेल्यात पालकमंत्री नसताना देखील त्यांनी अनेक कामे केल्याचे निदर्शनास येते.
तसेच नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी सर्वाधिक सात जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटाने विजय मिळवला असून सर्वाधिक आमदारांचा जिल्हा बनला आहे. त्यामुळे दूरदृष्टि ठेऊन नाशिक जिल्ह्याचा योग्य विकास व कुंभमेल्याचे यशस्वी नियोजनाकरिता छगनराव भुजबळ यांनाच पालकमंत्री पद मिळावे अशी सर्व नाशिककरांची प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी अंबादास खैरे यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत साकडे घातले असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे देखील मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी योगेश निसाळ, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, हर्षल चव्हाण, व्यंकटेश जाधव, संदीप खैरे, निलेश जाधव, कुलदीप जेजूरकर, रेहान शेख, हरिष महाजन, महेश बाळसराफ, भूषण पाटील, दिपक बने, आशुतोष चव्हाण, जयेश टोचे, हर्षल वाघ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.