बंगळूर – बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर ‘छत्रपतींचा आशिर्वाद’ असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का..? कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असेही भुजबळ यांनी सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.