नाशिक – गेले अनेक दिवस कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर आणि जगावर होतं आणि अजूनही आहे. या संकटकाळात आपण अनेक गोष्टी बंद ठेवल्या, त्यात अगदी मंदिरे आणि शाळा देखील होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आपण पुन्हा सर्व गोष्टी सुरू करत आहोत. आज शासनाच्या वतीने मंदिरे सुरू करण्यात आलेली असून राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे अशी सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना आपण केली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सप्तश्रृंगी गडावरील मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत कळवणचे आमदार नितीन पवार होते.ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय आपण घेत आहोत. महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत या सर्व मंदिरांवर उदरनिर्वाह असणारी अनेक कुटुंबं आहेत याचा विचार महाविकास आघाडी शासनाला होता मात्र संकट मोठं असल्याने काही कठोर निर्णय राज्य शासनाला घ्यावे लागले. आज राज्यातील मंदिरे उघडली आहेत मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे पालन करूनच सर्वांनी दर्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे नाशिक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच मात्र या संकटातून सावरण्याचे बळ शेतकऱ्यांना मिळो अशी प्रार्थना आज मी केली. त्याचबरोबर राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे अशी देखील प्रार्थना आज मी केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.