जळगाव -वारंवार पत्रव्यवहार करूनही आरोपींच्या संदर्भातील माहिती देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणाऱ्या जळगावातील काही बॅंका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आल्या असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. बीएचआर घोटाळ्यातील आरोपींचे बँक खाते, एफडी,कर्ज आदी संबंधी माहितीसाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावातील एसबीआय, कोटक,देवनागरी, जनता, युनियन, पीपल्स आदी बँकेसोबत काही दिवसांपासून पत्रव्यवहार सूरु आहे. परंतु बँकांकडून अपूर्ण किंवा चुकीची माहिती पुरवली जात आहे. त्यामुळे या गोष्टींचा बीएचआर घोटाळ्याच्या तपासावर गंभीर परिणाम होतोय.
संबंधित बँक आरोपींची माहिती मुद्दाम लपवित असल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे. अगदी आरोपींना अप्रत्यक्ष मदत होईल,अशीच भूमिका बँकांची असल्याचाही आर्थिक गुन्हे शाखेला दाट संशय आहे. कारण आरोपींच्या खात्यासह इतर माहीतीसाठी बँकेत फोन केल्यावरही कर्मचारी व्यवस्थित संभाषण करत नाहीय. टाळाटाळ किंवा एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं येत्या काही दिवसात आर्थिक गुन्हे शाखा चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणाऱ्या बँकांविरुद्ध कडक कायदेशीर करवाई करण्याच्या तयारीत आहेत. अगदी आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याच्या आरोपाखाली काहींना आरोपी केले जाऊ शकते, अशी देखील चर्चा आहे. दरम्यान, आयकर विभागाकडूनही आर्थिक गुन्हे शाखेला पाहिजे तसं सहकार्य मिळत नसल्याचेही कळतेय.
बँकांकडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती
आम्ही अनेक दिवसांपासून संबंधित बँकांकडे वारंवार आरोपींशी निगडित माहिती मागत आहोत. परंतू आम्हाला बँकांकडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली जातेय. थोडक्यात आरोपींना अप्रत्यक्ष मदत करण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळं गरज भासल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
– पो.नि. सुचेता खोकले
तपासधिकारी, बीएचआर घोटाळा