विजय वाघमारे
जळगाव – बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. तत्पूर्वी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पोलिसांनी जळगावात छापेमारी केल्यानंतर झंवरचे घर व खान्देश मिल कॉम्प्लेक्स येथील कार्यालयातून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, पुरावे जप्त केले होते. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पिस्तूलचे लायसन्स, युजर मॅन्युअलच्या झेरॉक्स मिळून आल्याची खळबळजनक माहिती नुकतीच समोर आली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावे असलेल्या पिस्तूल परवाना क्रमांक एजेएम/२/९इच्या झेरॉक्सची पाच पाने व रिव्हॉल्वर ३२ एमके १ युजर मॅन्युअल व सुनील झंवरचे शस्त्र परवाना नूतनीकरण याबाबतचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे २५ फेब्रुवारी २००३ चे पत्र मिळाले आहे. याशिवाय युनियन बँक ऑफ इंडियाचे ८३ डेबिट कार्ड, १०१ पासबुक व चेकबुकचाही समावेश आहे.
कार्यालयात मिळालेली कागदपत्रे अशी
पाळधी ग्रामपंचायतचे कोरे लेटरपॅड, भाडेकरार दस्तऐवज (२५ ऑगस्ट २०२०), दिया नितीनकुमार साहित्या व सुनील झंवर यांचे सामायिकतील खरेदीखत दस्त (२७ डिसेंबर २०१७), श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीकडील भारतीय खाद्य निगमक्षेत्र टेंडरची डॉक्युमेंट झेरॉक्स फाईल, आदिवासी विकास आयुक्तालयाचे रबरी स्टॅम्प, राज्यभरातील सुमारे ५० च्यावर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे रबरी स्टॅम्प सन २००६ च्या विधानसभा अधिवेशन आश्वासन क्रमांक १०५६ बाबत खाजगी कंपनीचे दिंडोरी तालुक्यात विकत घेतलेल्या कंपनीची कागदपत्रे आणि विविध ड्रायव्हिंग स्कूलच्या नावाचे ८३ डेबिट कार्ड मिळून आले आहेत.