नाशिक – बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नाशिक येथून अटक केली आहे. दरम्यान, तत्पूर्वी पोलिसांचे पथक दहा दिवसापासून झंवरच्या मागावर होते. त्यानंतर रात्रभर पद्धतशीरपणे सापळा रचल्यानंतर आज सकाळी पंटवटी येथील एका घरातून १०:३० वाजता त्याला अटक करण्यात आली. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून नऊ महिन्यापासून फरार होता. मागील काही १० दिवसापासून पोलिसांना झंवरचा सुगावा लागलेला होता. त्यांनतर आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. सुनील झंवर पोलिसांना गुंगारा देत होता. आधी अहमदाबाद त्यांनतर उज्जैन आणि काल रात्री तो नाशिक येथे पोहचला. नाशिकला पोहोचल्याबरोबर पोलिसांनी पंचवटी येथील घराला सर्व बाजूने घेरले. झंवरच्या अटकेचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर आज सकाळी १० :३० वाजता पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यापूर्वी ज्यावेळी झंवर गॅलरीत आला. त्यावेळी त्याचे गपचूप फोटो काढून झंवरच असल्याचे कन्फर्म करण्यात आले. नाशिक येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे झंवरला पुण्याला घेऊन जाणार आहेत.