नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विद्यार्थी केंद्रभूत ठेवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला साजेशा नियमित शिक्षणाबरोबरच सैनिकी, क्रीडा साहसविषयक शिक्षण देणे, शैक्षणिक गुणवत्ता व विकास उंचावण्यासाठी सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींना प्राधान्य देत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने नागपूरला भोसला विद्यापीठ स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. संस्थेच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यात आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी सभेसमोर मांडला. ही केवळ विद्यापीठ निर्मिती नसून एक राष्ट्रीय चळवळ आहे, जिथे शिक्षण, शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्व यांचा संगम साधला जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रीया सध्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेची सभा डॉ. मुंजे इंस्टीट्यूट येथील सभागृहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष ले. जन. डॉ. दत्तात्रय शेकटकर (से.नि. पी.व्ही.एस.एम., ए.व्ही.एस.एम., व्ही.एस.एम.) हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेचा कोरम पूर्ण झाल्याने सभेचे कामकाज ठरल्यानुसार वेळेवर सुरु झाले. त्यानंतर वर्षभरातील शहीद आणि दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्ताचे वाचन केले तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. त्यात प्रामुख्याने अरूणाचल प्रदेश येथील सुरू असलेले एनडीए प्रशिक्षण त्याचप्रमाणे मुरूड येथे सुरू केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयास (विज्ञान शाखा) चांगला प्रतिसाद लाभत आहे असे सांगितले. नाशिक येथील कॅम्पसमध्ये वर्षभरात तसेच भविष्यातील आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या निर्णयांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
नाशिक व नागपूरचा शैक्षणिक आढावा
नाशिक विभागाचे कार्यवाह मिलिंद वैद्य यांनी नाशिक विभागाने गेल्या शैक्षणिक वर्षात केलेल्या शिक्षणोपक्रम, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून संस्थेने त्यादृष्टीने केलेल्या विकासाची अमंलबजावणी, गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न यासारख्या बाबींचे विवेचन केले. तसेच नागपूर विभागाचे कार्यवाह राहुल दिक्षित यांनी नागपूर विभागातील भोंसला मिलिटरी स्कूल व नवीन सुरू झालेल्या सैनिकी स्कूलबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे वर्षभरात नागपूर येथे झालेल्या विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच येत्या काळात संस्था नव्याने आखत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
कागदविरहित काम,ऑनलाईन कार्यपध्दती जमेची बाजू
संस्थेने कागदविरहीत काम आणि ऑनलाईन कार्यपध्दतीच्या जोडीला मानव संसाधन विकास व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले असल्याचे मिलिंद वैद्य यांनी नमूद केले. संस्थेचे कोषाध्यक्ष सीए मनोहर नेवे यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५च्या लेखापरिक्षणासह ताळेबंद मांडला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच त्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चे अंदाजपत्रक मांडले व त्यासदेखील सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली. संस्थेचे अध्यक्ष ले. जन. डॉ.शेकटकर यांनी सर्वांचे आभार मानत पुढील काळात आखलेल्या विविध गुणवत्तापूर्ण व विकासात्मक कामासाठी सर्वांनी सहकार्य करावे, योगदान द्यावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे नाशिक व नागपूर विभागाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी संस्थेने ठोस कामे करत जी वेगाने वाटचाल सुरु केली आहे त्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सर्वांचे कौतुक केले. सभेत उपस्थित सदस्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.