मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भोंगे वापराचा मुद्दा राजकीय दृष्टीकोनातून चांगलाच तापला आहे. या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना त्यांनी आव्हान दिलं आहे. अजानला विरोध करणं चुकीचं असून, राज ठाकरे समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करीत रिपाईंचे कार्यकर्ते 3 मे रोजी ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील, असंही रामदास आठवले म्हणालेत.
शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर लागलीच मनसे आणि भाजपची जवळीक वाढली. या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. मात्र, भाजप आणि मनसेची युती शक्य नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत. राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला परवडणारं नाही. तसंच रिपाइं सोबत असताना भाजपला मनसेशी युती करण्याची गरजच नाही, असंही आठवले म्हणालेत.
दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे. आठवलेंच्या या वक्तव्यांमुळे आता मनसे विरुद्ध रिपाइं असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे