ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन खऱ्या अर्थाने तीन आमदारांसाठी विघ्नहर्ता ठरले आहेत. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकले असता त्यांचा जीव वाचविण्याचे कार्य गिरीश महाजनांनी केले आहे.
राजकीय संकट आले की सर्वांत प्रथम भाजपचे पदाधिकारी संकटकमोचक गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेतात. राजकीय पेच असो वा कुठली समस्या महाजन यांच्याशिवाय पान हलत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे राजकीय कौशल्य सर्वांनीच अनुभवले आहे. शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामकडे लक्ष देणारे महाजन तसे फिटनेस फ्रिक आहेत. त्यांच्या फिटनेसचा परिचय नुकताच दरेकर, म्हात्रे आणि महल्ले यांना आला. भारतीय जनता पक्षाची कार्यशाळा आज भिवंडीतील साया ग्रँड क्लब येथे पार पडत आहे.
कार्यशाळेला भाजपचे सर्व आमदार-खासदार उपस्थित आहेत. या कार्यशाळेला आलेले ३ आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. यावेळी भाजप नेत आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या आमदारांच्या मदतीला धावून आले आणि त्यांची सुटका केली. लिफ्टचा दरवाजा वाकवत गिरीश महाजन यांनी आमदारांना बाहेर काढले. बराच वेळ लिफ्टमध्ये अडकल्याने नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यावेळी प्रविण दरेकर यांनी त्यांना आधार दिला.
२०२४साठी कार्यशाळा
भाजपने महाराष्ट्रात २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांचा प्रशिक्षण वर्ग भिवंडी येथे पार पडत आहे. या प्रशिक्षण वर्गास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शन करतील.