ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोर नेहमी एक चूक करतोच, असे पोलीस म्हणतात. विशेषतः अट्टल गुन्हेगार असतील तर विकृती आणि आक्रमक स्वभावामुळे त्यांच्या हातून तर अशी कुठली तरी चूक होतेच आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. अलीकडेच भिवंडीतील वेश्या वस्तीमधून पोलिसांनी अश्याच चार अट्टल गुन्हेगारांना पकडले आहे.
ठाण्यातील भिवंडीमध्ये हनुमान टेकडी या नावाने मोठी वेश्या वस्ती आहे. या वस्तीतील महिलांना गुंडांकडून सातत्याने नाहक त्रास दिला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणामुळे त्याची अधिकच चर्चा होत आहे. चारही गुन्हेगार नवी मुंबई परिसरातील दिघा गावात राहणारे आहेत. रविवारी १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शरीराची भूक भागविण्याच्या उद्देशाने चौघेही भिवंडीतील खदानरोड येथील हनुमान टेकडी भागात वेश्यावस्तीत येणार आहेत अशी खबर पोलिसांना लागली होती.
चौघेही एका कारमधून येणार आहेत आणि त्यांच्याकडे हत्यारं असतील, हे पोलिसांना कळले होते. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी शहर पोलिसांनी वेश्यावस्तीत सापळा रचला आणि चारही गुन्हेगारांना झडप घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. आशिष विनोद बर्नवाल (वय 20), मोह. जुनैद मोह. नदीम कस्सार (वय 18), अहमद अली हसन शा (वय 20) आणि अतिरुपती अजयकुमार पाणिग्रही (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. चौघांनाही भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तीन महिन्यांपूर्वी राडा
फेब्रुवारीमध्ये याच ठिकाणी हफ्ता मागायला आलेल्या गुंडाचा मोबाईलमध्ये व्हिडियो काढणाऱ्या सेक्सवर्करला चाकून भोसकून जखमी करण्यात आले होते. यावेळी तीन गुन्हेगार वस्तीत होते. तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhiwandi Police Arrest 4 Criminals