इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भिवंडीः महाराष्ट्रातील भिवंडी, ठाणे येथे तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तिन्ही मुले वहाळ तलावात पोहण्यासाठी गेली होती. या वेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यात दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तिसरा मुलगा अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सकाळी पुन्हा सुरू करण्यात आला.
पीर मोहम्मद शेख (वय १३ ), गुलाम मुस्तफा अन्सारी (वय ११), दिलबर रझा (वय १४ ) ही तिन्ही मुले गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे निघाली होती; मात्र सायंकाळपर्यंत तिघेही जेव्हा घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. या वेळी ते तिघेही वहाळ तलावात पोहण्यासाठी गेल्याचे एका मुलाच्या भावाला समजले. त्यानंतर ते कुठेच न सापडल्याने कुटुंबीयांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली. यासोबतच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या वेळी दोन मुलांचे मृतदेह सापडले; मात्र अंधारामुळे तिसऱ्या मुलाचा शोध थांबवावा लागला. गुलाम अन्सारी अद्याप बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यासाठी आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली.
याआधी सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जितिया स्नानादरम्यान तलावात आंघोळ करताना आठ मुलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर एका मुलीला गावकऱ्यांनी वाचवले होते