ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. १३६ भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयाचा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणी दरम्यान सादर न केल्याने भरारी पथकामार्फत धडक कारवाई करीत हा मुद्देमाल जप्त केला आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
१३६ भिवंडी पश्चिमचे भरारी पथक क्र. ७ व नारपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पहाटे ३ वाजता एक संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी ही गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली. पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीच्या मालक व पंचासमक्ष गाड़ी तुन खाली उतरावला. संशयित वाहनातून एकंदर ७३ छोटे मोठे बॉक्स मधील साहित्य व त्या साहित्याच्या बिलाची तपासणी केली.
या वाहनामध्ये असलेल्या ७२ बॉक्समध्ये सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असलेले एकंदर रू. २,०८, १७,८२०/- चा मुद्देमाल सापडला. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने बॉक्सनिहाय त्यात समाविष्ट असणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के बिल सादर केले व अनुषंगिक खात्री पंचासमक्ष व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानुसार एकूण ६० बॉक्स मध्ये असलेल्या सोने व चांदी चे गिफ्ट आर्टिकल चे २,०४,८६,२११/- ( रू.2 कोटी 4 लक्ष 86 हजार 211) चे बिल सादर केले. उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या रू.३ लक्ष ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल ज्यात चांदी व चांदी चे काम असलेले गिफ्ट आर्टिकल असून त्याचे बिल संबंधितास सादर करता आले नाही. याबात पोलीस अधिक तपास करीत आहेत. सामानांची ने-आण करताना त्याची अधिकृत बिले सोबत ठेवावी. तपासणी दरम्यान अनधिकृत ऐवज व रक्कम सापडयास कारवाई केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व यंत्रणा निवडणूक शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.