मुंबई – मुंबई येथील BIS अर्थात भारतीय मानक मंडळातील अधिकाऱ्यांच्या पथकाने “भारतीय मानक ३०३ नुसार सामान्य वापरासाठीचे प्लायवुड आणि भारतीय मानक ७१० नुसार पाण्यात वापरण्यायोग्य प्लायवुड” या आयएसआय चिन्हाच्या गैरवापराबाबत तपासणी करण्यासाठी २३ जुलै रोजी सक्तीचे छापे आणि जप्तीची कारवाई केली. भिवंडीतील मेसर्स. हरी ओम प्रॉडक्ट्स, या ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये BIS प्रमाणित चिन्हाचा शिक्का असलेले एकूण २४,६०० प्लायवुडचे नग जप्त केले. BIS च्या प्रमाणित चिन्हाचा गैरवापर हा गुन्हा असून असे करणाऱ्याला BIS २०१६ कायद्यान्वये दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा २ लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या प्रकरणी या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अनेकदा मोठा नफा मिळविण्याच्या उद्देशाने, खोटी आयएसआय चिन्हे असलेली उत्पादने निर्माण करून ग्राहकांना विकली जातात असे निदर्शनास आले आहे. म्हणून, अशी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्यावरील आयएसआय चिन्हाचा खरेपणा तपासून पाहण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी BISच्या http://www.bis.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या. आयएसआय चिन्हाचा गैरवापर होत असल्याची घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रमुख, MUBO-II, पश्चिम विभाग प्रादेशिक कार्यालय, BIS, मानकालय, E9, मरोळ टेलीफोन एक्स्चेंजच्या मागे,अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093 या पत्त्यावर संपर्क साधावा. hmubo2@bis.gov.in या ईमेल पत्त्यावर देखील अशा घटनांची तक्रार नोंदविता येईल. अशा घटनांतील माहितीचा स्त्रोत गुप्त ठेवण्यात येतो.