भागलपूर – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील दियारा रशीदपूर येथील माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी पूराच्या पाण्यात ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला. या भागात पूरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशावेळी शाळेच्या आवारात पूर्ण पुराचे पाणी असतांना शिक्षकांनी मात्र भर पाण्यात उतरुन स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यांच्या या साहसाबद्दल टिचर ऑफ बिहारने एक ट्विट करत या ध्वजारोहणाचा व्हिडिओ टाकला असून तो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतो आहे. टिचर ऑफ बिहारने फेसबुकवरही ही पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, भागलपूरच्या रशीदपूर दियारा येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमार मंडल, शिक्षक दिलीप कुमार रजक, सत्यम कुमार आणि सुमन कुमार यांनी चिंता न करता आणि पूरपरिस्थितीत धैर्याने त्यांच्या शाळेत ध्वज फडकवला. या कठीण परिस्थितीत शाळा परिवाराने जे काम केले आहे ती मातृभूमीच्या सेवकांना खरी श्रद्धांजली आहे. बिहारच्या शिक्षकांची संपूर्ण टीम तुमच्यासारख्या सर्व शाळा आणि शिक्षकांना सलाम करते. जय भारत
https://twitter.com/teachersofbihar/status/1426794396784070658?s=20