टोकियो – येथे सुरू असलेल्या पॅरॉलिम्पिकमध्ये भारताची टेबलटेनिसपटू भाविना पटेल हिने इतिहास रचला आहे. भाविनाने महिला एकेरी सामन्यात क्लास ४ च्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. तिने उपांत्य सामन्यात चीनच्या मियाओ झांग हिला ३-२ (७-११,११-७, ११-४, ९-११, ११-८) अशा फरकाने नमविले. भाविना आता सुवर्णपदक पटकावण्याच्या एक विजयापासून दूर आहे. अंतिम सामन्या भाविनाचा सामना चीनच्या झोऊ यिंग हिच्याशी होणार आहे. अंतिम सामना २९ ऑगस्टला सकाळी सव्वासात वाजता होईल.
भाविनाने यापूर्वी झांगविरुद्ध ११ सामन्यांमध्ये समोरासमोर आली होती. परंतु ती विजयापासून वंचितच राहिली. या विजयानंतर तिने मागील पराभवाचा बदला घेतला आहे. भाविनाने यापूर्वीच्या सामन्यामध्ये राउंड ऑफ १६ सामना क्रमांक २० मध्ये ब्राझीलच्या ओलिविएराला पराभूत केले. तिने हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला. भाविनाने पहिली फेरी १२-१० ने, दुसरी फेरी १३-११ आणि तिसरी फेरी ११-६ ने जिंकली. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात किराणा दुकानदार हसमुखभाई पटेल यांची भाविना ही मुलगी आहे. भाविनाला सुवर्णपदकाचे दावेदार मानले जात नव्हते. परंतु दमदार कामगिरीने तिने इतिहास रचला आहे. १२ वर्षांची असताना तिला पोलिओ झाला होता.