टोकियो – येथील पॅरॉलिम्पिकमध्ये टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या भाविनाबेन पटेलने रौप्यपदक जिंकून इतिहास घडविला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनीच भाविकाबेनने भारताला पदक जिंकून दिल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात भाविनाला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या यिंग झोऊने ०-३ असे पराभूत केले. पराभव झाला तरी भाविनाने कोट्यवधी भारतीयांचे मन जिंकले आहे. ३४ वर्षीय भाविनाने पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले. भाविनाने शनिवारी उपांत्य सामन्यात जगातील तिसर्या स्थानावर असलेल्या खेळाडूला ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ अशा फरकाने पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतु अंतिम सामन्यात भाविनाला लय सापडली नाही. त्यामुळे १९ व्या मिनिटातच तिला सामना गमवावा लागला. भाविनाने पदक जिंकल्यामुळे भारताने पदकाचे खाते उघडले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने रौप्यपदक पटकावून भारताचे पदकाचे खाते उघडले होते. महिला अॅथलीट भारत्तोलन क्रीडा प्रकारात मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. झोऊच्या खात्यात पाच पॅरॉलिम्पिक पदक आहेत. त्यामध्ये बीजिंग आणि लंडन पॅरॉलिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते. सहा वेळा जागतिक विजेतेपदही तिने मिळविले होते