विशेष प्रतिनिधी, नाशिक
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कपडे काढल्याप्रकरणी ऑपरेशन हॉस्पिटल या अभियानाचे जितेंद्र भावे यांच्यावर आणखी एक गुन्हा मुंबई नाका पोलिस स्टेशन दाखल झाला आहे. भावे यांच्याबरोबरच हा गुन्हा अमोल जाधव यांच्यावर सुध्दा दाखल करण्यात आला आहे. भावे यांच्यावर अगोदर दोन गुन्हे दाखल असतांना हा तिसरा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे या प्रकरणी नमन गंगाप्रसाद यादव यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, भावे व जाधव यांनी संगनमत करुन हॅास्पिटलमध्ये आरडओरड करुन स्वतचे अंगावरील कपडे काढून हॅास्पिटलमधील महिला स्टाफच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच जर पैसे परत केले नाही तर अंडरपॅन्ट सुध्दा काढू असे धमकावून हॅास्पिटल प्रशासन व कर्तव्यावरील डॅाक्टर यांना शिवीगाळ केली.
मुंबई पोलिस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा भादवि ५०४,५०६,५०९, ३४ सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृती व मालमत्तेची हानी प्रतिबंधक अधिनियम २०१०चे कलम ४ नुसार हा नोंदविण्यात आला आहे.
तिसरा गुन्हा दाखल
याअगोदर वोक्हार्ट हॉस्पिटल प्रकरणात अगोदर एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भावे यांच्याविरोधात कॉलेजरोडवरील व्हिजन हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या उपचार बीलावरुन गोंधळ घातल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
आम आदमी पार्टीतर्फे राज्यभर मोहिम
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची खासगी हॉस्पिटलकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत भावे आणि त्यांच्या साथीदारांनी ऑपरेशन हॉस्पिटल ही मोहिम सुरू केली आहे. आता ही मोहिम राज्यभर आम आदमी पार्टीतर्फे राबविण्यात येणार असल्याचे कालच घोषित करण्यात आले. त्यातच भावे विरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.