संरक्षित क्षेत्रातला दुर्ग बहुला
लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या बहुला परिसरातील दुर्ग बहुलाची माहिती आज आपण घेणार आहोत. फारसा परिचित नसलेला आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा दुर्ग एकदा तरी बघायलाच हवा…

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
देवळाली कॅम्प भाग भारतीय सैन्याचे संरक्षित क्षेत्र आहे. साधारण एकोणिसाव्या शतकापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळात देवळालीच्या भागाचा सैन्यदलासाठी वापर सुरु झाला. ‘तोफखाना केंद्र’ तर भारत-पाकिस्तान फाळणी नंतर पूर्णपणे देवळाली कॅम्प भागात सामाविष्ठ झाले. त्यावेळी संपूर्ण भारताचा सर्व्हे करून तोफखाना प्रशिक्षणासाठी हे ठिकाण निवडले गेले.
देशभरातील सैन्यातील गोलंदाज येथे तोफा चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आणि सरावासाठी येत असतात. बोफोर्ससकट विविध प्रकारच्या आधुनिक तोफा चालविण्याचा नियमित सराव येथे केला जातो. त्यासाठी त्यांचे टारगेट असते ते म्हणजे ‘बहुला’. बहुला हा तसा प्राचीन किल्ला पण दररोज त्याला अनेक तोफगोळे येऊन धडकतात.

मिलिटरी एरीयात असल्याने अर्थातच त्यावर नागरीकांना जाण्यासाठी बंदी आहे. परंतु संरक्षण खात्याकडून विशेष परवानगी काढून आपण तेथे जाऊ शकतो. रविवारच्या दिवशी तोफांच्या गोळीबाराला विश्रांती असते. बहुला दुर्गाच्या पायथ्याशी सर्वांत जवळ असलेले पायथ्याचे गाव म्हणजे आंबेबहुला. नाशिकपासून अगदी १४ कि.मी. अंतरावरचे हे गाव. गोळीबार बंद असतो त्यादिवशी काही लोक बहुला किल्ल्याच्या परिसरात ये-जा करत असतात. पण हा अधिकृत मार्ग नाही.
बर्याच वर्षांपासून खटपट करून आम्ही विशेष परवानगी घेऊन बहुला परिसरात दाखल झालो. आंबेबहुला गावातून समुद्रसपाटीपासून ९६५ मीटर (३१८० फूट) उंचीचा बहुला उठून दिसतो. गावातून बहुला किल्ल्याच्या दिशेने निघाल्यावर गावाच्या एका बाजुला असलेल्या ओढ्यावर बांधलेला बंधारा लागतो. बंधार्याच्या अलिकडे मोठ्या वडाच्या झाडाखाली देवीचे स्थान आहे. या प्राचीन देवतांचे दर्शन घेऊन बंधार्याची भिंत पार करत बहुल्याच्या दिशेने कुच करायची.

थोडं पुढे गेलं की एक डांबरी सडक लागते. ही फक्त मिलिटरीच्या वहिवाटीची आहे. डांबरी रस्ता ओलांडून पुढे स्पष्ट-अस्पष्ट होत जाणार्या पायवाटा बहुल्याच्या दिशेने गेलेल्या दिसतात. चुकण्याचा तसा प्रश्न नाही कारण, या भूभागात उंच झाडी नाही. खुरट्या झूडूपांचे चांगले जंगल आणि बाकी निर्जन गवताळ माळ आहे. बहुल्याच्या अलिकडे असणारा डोंगर त्याच्या माथ्यावरील विविध आकारातल्या उभ्या खडकांमुळे आकर्षक दिसतो. हा डोंगर आणि बहुला यांच्यातील खिंड मात्र लांबूनच दिसत असते. तेच आपले टारगेट.
करवंद, बाभूळ, काटेसावर अशा अनेक प्रकारची झुडूपं आणि पवन्या, हेम्टा आणि कुसळ प्रजातीचं गवत यांचं निरीक्षण करत ती खिंड गाठायची. मानवाचा हस्तक्षेप नसल्याने गवताळमाळावरचे अनेक पक्षी इथे निर्भयपणे वास्तव्यास असलेले दिसतात.
खिंडीच्या अलिकडे भले मोठे कातळकोरीव पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाण्याच्या टाकीत संपूर्ण गाळ भरलेला आहे. टाक्याच्या वरच्या भागात चौकीसारखे जोते आहे. इथून थोडं वर गेलं की खिंडीतून पूर्वेकडील संपूर्ण सखल दरी आणि निश्चल जंगल मोहून टाकते. गोळाबार बंद असतो म्हणून बरं नाहीतर या दरीच्या पलिकडून तोफगोळे बहुल्यावर येऊन धडकत असतात.

खिंडीतून उजव्या हाताला म्हणजेच दक्षिणेकडे वर जाणारी पायवाट आहे. फार चढण नसली तरी थोडी नागमोडी फिरत जाऊन वर दिसणार्या खड्या कातळपायथ्याशी जाऊन भिडते. खिंडीपासून कातळकड्यापर्यंतच्या वाटेवर साधारण मध्यावर गोलाकार आकारात असलेल्या बुरूजाचे जोते आहे.
आता त्याच्या सर्व चिरे पडून फक्त त्याच्या पायथ्याशी असलेल्या दगड बसविण्याच्या खाचा तेवढ्या दिसतात. वर कातळकड्याच्या पोटात पश्चिमाभिमुख म्हणजे मुंबई महामार्गाकडे तोंडकरून असलेल्या गुहा आहेत. एकसंध कोरलेल्या या गुहा खांबांनी तोलून धरलेल्या आहेत. पहिली गुहा आकाराने मोठी असून आत छोट्या आकाराचे दोन दालन आहेत. गुहेच्या प्रवेशद्वाराला दरवाजा अडकविण्यासाठी खटक्यांसारखे कोरीवकाम केलेले आहे. गुहेला लगटून कड्याला डावीकडे ठेवत अगदी थोडं पुढे जायचं. इथेही काही गुहा कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.
उभ्या कातळकड्याला गेलेल्या उभ्या नैसर्गिक भेगेचा आधार घेत साधारण सत्तर-पंच्याहत्तर पायर्यांचा उभा सोपान कोरलेला आहे. जिन्याव्यतिरिक्त अन्य मार्गाने वर चढू नये म्हणून उभा कातळ तासून काढलेला आहे. प्राचीन काळी ज्यांनी कुणी हा मार्ग बनविला असेल त्या अनामिकांना मनोमन नमस्कार केल्यावाचून राहत नाही. अंगावर येणार्या उभ्या जिन्याच्या पहिल्या पायर्यांची रूंदी दीड-दोन फूटांची आहे तर जसजसे वर जावे तशी खिंड आणि पायर्यांची रूंदी सहा फूटांपर्यंत वाढत जाते.

बहुला किल्ला बघायला यावं फक्त या पायर्यांची अनोखी रचना अनुभवण्यासाठी! पायर्या जिथे संपतात तिथे प्रवेशद्वार आहे. आता हे संपुर्णपणे ढासळलंय पण बाजूच्या तटबंदीमुळे ओळखू येतं. आपण गडमाथ्यावर आलेलो असतो. वापरात नसल्याने माथ्यावर विविध दिशांना असलेली चार ते पाच पाण्याची टाकी पूर्णतः बुजली आहेत तरी देखील ओळखू येतात. पण माथ्यावर दक्षिणदिशेला असलेली कपारीतली पाण्याची टाकी मात्र चांगल्या अवस्थेत आहे.
मध्यभागी काही जोती आणि बांधकामावशेष दिसतात. माथ्यावर गडफेरी करत असतांना कड्याच्या काही भागांवर तटबंदी दिसून येते. बाकी शेजारी असलेल्या रायगडापर्यंतचे सर्व शिखरं अगदी जवळून न्याहाळता येतात. तिकडे देवळाली मिलिटरीचा निर्मनुष्य परिसर जैवविविधता, गर्द झाडोरा आणि नैसर्गिक संपत्ती सांभाळत असलेला दिसतो. देवळालीच्या पलिकडे औंढा आणि पट्टा खूणावत असतात. पांडवलेणी आणि त्याच्या शेजारील दोन प्रमुख डोंगर, कावनई, अंजनेरी, नवरानवरी, आठवा डोंगर, आधुली, डांग्या सुळका, घरगड, त्र्यंबकगडाचे पंचलिंग असे कितीतरी पर्वत विहंगम दिसतात. हा सर्व नजारा बघतांना डोळ्यांचं पारणं फिटतं.









