नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्रकारिता, राजकीय आणि आता साहित्यिक प्रवास करणारे ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या ‘नांदगाव ते लंडन’ हे प्रवासवृत्त तसेच ‘उजेड पेरायचा आहे’ हा कवितासंग्रह या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा २५ मे रोजी नाशिक येथील सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कविवर्य फ. मुं. शिंदे यांच्या उपस्थितीत हा संपन्न होणार आहे. त्यामुळे साहित्यिक तसेच राजकीय विचारांची मेजवानी लुटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव शहरातून सुरुवात केलेले ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून आपल्या जीवनानुभवाचे विविध पैलू शब्दातून मांडले आहे. सुरवातीला पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले कदम यांनी नंतरच्या काळात राजकारणात नांदगाव शहराचा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र आता आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात त्यांनी शब्दांना अनुभवाची धार दिल्याने त्यातून दोन कलाकृती निर्माण झाल्या. कदम यांची लंडनवारी खूपच गाजली त्यांच्या गाठीशी आलेल्या अनुभवाला त्यांनी शब्द रूप देवून ‘नांदगाव ते लंडन’ आत्मवृत्त लिहिले. इतकेच नाही तर अनुभवांचा काव्याविष्कार ‘उजेड पेरायचा आहे’ या कवितासंग्रहात शब्दबद्ध केला आहे.
या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात गुरुवार दि. २५ मे रोजी सायं. ५ वा. करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ असणार आहे तर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कविवर्य फ. मुं. शिंदे व साहित्यिका प्रा. लीला शिंदे या साहित्यिक दाम्पत्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हे एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने तसेच फ. मुं. शिंदे व त्यांच्या पत्नी प्रा. लीला शिंदे या पहिल्यांदाच प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने नाशिकमध्ये एकत्र येणार असल्याने हा प्रकाशन समारंभ राजकीय तसेच साहित्यिकदृष्टीने औत्सुक्याचा ठरणार आहे.
माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, कवी-गीतकार प्रकाश होळकर, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपुरकर, जिल्हा कृषी संघाचे संचालक बापूसाहेब कवडे, माजी आमदार अनिल आहेर हे प्रमुख पाहुणे असणार आहे. तसेच या समारंभास इंडिया दर्पणचे गौतम संचेती, सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, लोकमतचे व्यवस्थापक बी. बी. चांडक, दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे, देशदूतचे व्यवस्थापक आर. के. सोनवणे, पुढारीचे संपादक प्रताप जाधव, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी बाबा गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, राष्ट्र सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन कोकाटे, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे, सावानाचे संचालक संजय करंजकर, पिंगळे पब्लिसिटीचे संचालक मोतीराम पिंगळे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर समारंभाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर करणार आहे. या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथाली प्रकाशन मुंबई व भास्कर कदम मित्र मंडळ, नांदगाव-नाशिक यांनी केले आहे.
Bhaskar Kadam Books Inauguration