चिपळूण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमध्ये रविवारी (२५ जुलै) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यादरम्यान त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एका उद्विद्न महिलेने मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. त्यावर महिलेशी आमदार भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. हा व्हिडिओ सोशल माध्यमांसह इतर माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधव यांच्यावर टीकेची झोड उठली. या घटनेवर भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव म्हणतात, लोकांना मदत करणे हा माझा हेतू आहे. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या भाचासारख्या मुलासोबत एखाद्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला विचारून बोलायचे असेल तर काम करणे अवघड आहे. ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः चिखलात पायी फिरून पाहणी केली आहे. त्यांच्या आदेशानुसार रस्त्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मतदारसंघातून ४०० ते ५०० माणसे साहित्य घेऊन पोहोचली आहेत. तसेच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेकडूनही माणसे आली आहेत. डंपर मागवून शहराची स्वच्छता सुरू झाली आहे. रस्ता साफ करत असताना टीका करणारे कुठे गेले, अशी विचारणा त्यांनी केली आहे. ज्यांनी कोणी हे घडविले आहे, त्याला योग्य वेळी उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
का झाली टीका
नागरिकांना कशीही मदत करा. हवे तर आमदारांचा एक-दोन महिन्यांचा पगार देऊ नका, अशी विनंती एका उद्विग्न महिलेने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर सोबत असलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी महिलेशी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही, तर काहीच फरक पडत नाही. आपल्या आईला समजावून सांग असे सांगणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली आहे.