नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिक्षक भास्कर भगरे हे खासदार होऊन यंदाच्या उन्हाळयात वर्ष होईल. ज्या ईर्षेने आणि एक मुखाने दिंडोरी लोकसभा क्षेत्राने एक साधा भोळा शिक्षक लोकवर्गणीतून दिल्लीत पाठवला त्याच भगरे मास्तरांना सध्या प्रशासकीय राजशिष्टाचाराने साईड ट्रॅक केल्याने भास्करराव भगरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
मुळात जिल्ह्याच्या सार्वभौम विकासात अथवा ठिकठिकाणच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी लोकांचा प्रतिनिधी राज्य सह देश पातळीवर पाठवला जातो. पाच वर्ष मिळणाऱ्या कालावधीत त्यांनी क्षेत्राचा सर्वांगीण विकास प्रशासकीय पातळीवर करणे गरजेचे असते. त्यासाठी संबंधित शासन हे त्या त्या लोकप्रतिनिधींना वेळोवेळी बोलवते. परंतु दिंडोरीचे खासदार भगरे यांच्याबाबत मात्र हेच प्रशासन राजकीय कोन लाऊन धरत असल्याचे त्यांच्याशी केलेल्या हितगुजातून पुढे आले आहे. नाशिकचा कुंभमेळा दोन वर्षांमध्ये संपन्न होईल. परंतु अद्याप पालकमंत्री ठरला नसल्याने तो पेच कायम असताना जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्तालयात झालेल्या राज्य मंत्री महोदयांच्या बैठकीला संबंधित विभागाने कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने भगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर सुरू असलेल्या सरकारी कामांची रेलचेल अद्याप कलरिंग स्थितीत असल्याने त्याला सार्वजनिक रित्या आकार देताना खासदारांना विश्वासात का घेण्यात आले नाही हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच राजशिष्टाचार कुणाच्या सांगण्यावरून हा पराक्रम करत आहे की ते विसरले हे शोधणे गरजेचे आहे.
काय आहे भगरे उवाच!
दिंडोरी लोकसभा क्षेत्र नाशिकला लागून आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्राधिकरण, तेथील विकास,नाशिक महानगर प्रभाव क्षेत्रातील रखडलेले प्रश्न,ड्रायपोर्ट चे भिजत धोंगडे, औद्योगिक धोरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर जिल्ह्यात आजवर अनेक नियोजन बैठका होत असताना संबंधित यंत्रणा आम्हाला न बोलवता परस्पर बैठका उरकून घेता आम्ही विरोधी गटाचे खासदार असुद्यात पण आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत.सार्वजनिक विकासात पक्षपात पणा करणे जनतेच्या हिताचे नसून अशाने राजकीय हेतू सिध्द होऊ शकतो पण लोकांचे प्रश्न जैसेथेच राहतील मग आम्हाला मत देऊन लोकांनी चूक केली का असाही अर्थ त्यातून निघतो त्यामुळे प्रत्येक बाबीत विश्वासात घेणे गरजेचे असून असा दूजाभाव करणे शासनाला शोभते का असा सवाल ही खा.भगरे यांनी उपस्थित केला.