मुंबई – भारतात प्रत्येक ५० किलोमीटरवर भाषा बदलते असे म्हटले जाते. हे तंतोतंत सत्य नसले तरीही भाषेचा लहेजा तरी नक्कीच बदलतो. पण एकाच जिल्ह्यात १०७ भाषा बोलल्या जातात, असे म्हटले तर कुणालाही आश्चर्य वाटणार. हे खरे आहे आणि हा जिल्हा आहे बेंगळुरू. बेंगळुरू हा असा एक जिल्हा आहे जिथे देशात सर्वाधिक भाषा बोलल्या जातात. दोन शिक्षणतज्ज्ञांनी २०११ च्या जनगणनेचे विश्लेषण करताना हा निष्कर्ष मांडला आहे. बेंगळुरूमध्ये एकूण १०७ भाषा बोलल्या जातात आणि त्यातील २२ अनुसूचित तर ८४ गैरअनुसूचित आहेत. देशात १०० पेक्षा अधिक भाषा बोलणारे आणखी दोन जिल्हे आहेत. त्यात नागालँडमधील दीमापूर (१०३) आणि आसाममधील सोनितपूर (१०१) या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. कमीतकमी वैविध्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये यनम (पुद्दुचेरी), कैमूर (बिहार), कौशम्बी आणि कानपूर ग्रामीण (उत्तरप्रदेश) व अरियालूर (तामिळनाडू) या जिल्ह्यांचा समावेश आहे. याठिकाणी २० पेक्षा कमी भाषा बोलल्या जातात.
मराठी बोलणारे २ टक्के
बंगळुरूमध्ये कानडी भाषा बोलणारे ४४ टक्के आहेत. तर याठिकाणी तामीळ (१५ टक्के), तेलगू (१४ टक्के), हिंदी (६ टक्के), उर्दू (१२ टक्के), मल्याळम (३ टक्के), मराठी (२ टक्के), कोकणी (०.६ टक्के), बंगाली (०.६ टक्के) आणि उडिया (०.५ टक्के) भाषा बोलल्या जातात. याशिवाय पोचुरी, कोंध, संगतम आणि वांचो या भाषा फार कमी लोक बोलतात.