भरूच (गुजरात) – गुजरातमधील भरूचमध्ये एका कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत दोन परिचारीकांसह १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर तेथील रुग्णांना दुसर्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. ही आग शुक्रवारी (३० एप्रिल) रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान लागली. यामध्ये अनेक रुग्ण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
भरूचमधील पटेल वेलफेअर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर कोविड कक्ष स्थापन करण्यात आला होता. पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह चुडासामा म्हणाले, रुग्णालयाच्या कोविड कक्षात उपचार घेत असलेले १४ रुग्ण आणि दोन परिचारिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ५० जणांना वाचविण्यात आले आहे. त्यांना दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चार मजल्याचे पटेल रुग्णालय भरूच-जंबुसर महामार्गावर आहे. एका ट्रस्टतर्फे रुग्णालय चालविले जाते. पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर एका तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सोबतच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीने ५० जणांचा जीव वाचविण्यात यश आल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी शैलेश संसिया यांनी सांगितले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. कोविड केअर सेंटरचे ट्रस्टी जुबेर पटेल म्हणाले, की संपूर्ण भरूचसाठी ही खूपच दुर्दैवी दुर्घटना आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने आम्ही इतर रुग्णांना दुसर्या रुग्णालयात दाखल केले आहे.